मुंबई: भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोचक टीका केलीय. पडळकरांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘भारतीय जनता पक्षातील अन्य कुठलीही व्यक्ती अशा पद्धतीने खालच्या पातळीवर प्रतिक्रिया देत नाही. पडळकर ही एक प्रवृत्ती आहे. भाजपमधील दोन-चार जणांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे त्यामधील पडळकर हे एक आहेत. त्यांची ही बेताल वक्तव्य येत आहेत त्यावर गांभीर्याने लक्ष देणं योग्य वाटत नाही, अशा शब्दात मिटकरी यांनी पडळकरांच्या टीकेला उत्तर दिलं आहे
‘ज्या व्यक्तीने बिरोबाची शप्पथ खाऊन स्वतःच्या समाजाला फसवलं आहे. त्यांच्यावर देवस्थान भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. एका म्हाताऱ्या महिलेची जमीन बळकावणे आणि मंगळसूत्र चोरीचाही गुन्हा त्यांच्यावर आहे. ती व्यक्ती एक प्रवृत्तीच आहे. अशी बांडगुळं भाजपमध्ये वाढत आहेत. याचं आत्मचिंतन भाजपने करावं’, असा टोला मिटकरी यांनी लगावलाय.
पडळकरांची शरद पवारांवर टीका
गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” असं पडळकर म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते. मात्र, राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली. काही जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.