मुंबई : रविवारी दिवसभर सोशल मीडियात एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. या व्हिडीओत काही तरुणांसोबत १८०० रुपयांवरुन घरकाम करणारी महिला भांडत असल्याचं दिसून येत होतं. सोशल मीडियात अनेकांनी हा व्हिडीओ गंमतीशीर आणि मनोरंजनासाठी शेअर केला होता. मात्र या व्हिडीओची गंभीर दखल राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाने घेतली आहे.
याबाबत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत असंही मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले आहे. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल होऊन त्या काकूंची थट्टा उडवण्यात येत होती. या व्हिडीओत ती महिला घरकामाचे १८०० रुपये मागत होती, ज्या तरुणांशी ती भांडत होती त्यांनी १८०० रुपये दिल्याचं वारंवार सांगत होते.