शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीकडून आलेल्या नोटीशीची सध्या राज्यात चर्चा आहे. त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. आता यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले असून, ईडीचा पायगुण चांगला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ईडीची नोटीस आली. त्यानंतर राज्यातील चित्रं पालटले. आता शिवसेनेला नोटीस आली आहे. त्यांच्याकडे आधीच मुख्यमंत्रीपद आहे. बहुतेक शिवसेनेला मोठे काही तरी मिळणार असे दिसते.
ईडीचा पायगुण चांगला आहे. सगळं चांगलं घडेल त्यामुळे येऊ द्या नोटीसा, असा जोरदार टोला सुळे यांनी लगावला. त्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मावळमध्ये आल्या असताना बोलत होत्या.
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, आता तर एक वर्ष झालं आहे. आता पुढची पाच वर्षेच काय 25 वर्षेही कधी उलटून जातील, हे कळणारही नाही, असा विश्वास व्यक्त केला.