मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांची सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी करत त्याला प्रश्न विचारला आहे. आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला सचिन तेंडुलकरनं ट्विटद्वारे उत्तर दिलं होते. त्यानंतर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असणाऱ्यांनी सचिन तेंडुलकरनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यापूर्वी भूमिका का घेतली नाही असा सवाल उपस्थित केला होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील सचिनला सल्ला दिला होता.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या पोस्टरवर काय? मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावरून ट्विट केल्यानंतर त्यावरून उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काही संघटनांनी तर सचिनला दिलेला भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याची मागणी केली आहे. सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ट्विटनंतर विविध शेतकरी संघटनांनी आपला रोष व्यक्त केला आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील? असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरला विचारला आहे.