IMPIMP

‘रेड झोन’ मधील ‘टीडीआर’ मुद्दा : अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाचा उतावीळपणा!

पिंपरी । विशेष प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘‘एक घाव दोन तुकडे’’ कारभाराचा धडाका सर्वश्रूत आहे. पण, पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेवक पंकज भालेकर यांच्या उतावीळपणामुळे दस्तुरखुद्द अजित पवार यांच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासह तळवडे-रुपीनगर परिसरातील रेड झोन बाधित भूमिपूत्र आणि नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे पाप भालेकर यांनी केले आहे.

‘रेड झोन’ प्रभावित भागातील रस्ते आणि जागांसाठी ५० टक्के टीडीआर दिला जातो. त्यामुळे भूमिपूत्र आणि जागामालकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे अन्य क्षेत्रांप्रमाणे १०० टक्के टीडीआर मिळाला, अशी मागणी आहे. याबाबत दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी मागणी केली. त्यानंतर दि.१३ मार्च २०२४ रोजी पुन्हा हीच मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली. त्यामध्ये सदर विषय ‘‘राज्याच्या नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे.’’ असे म्हटले आहे.
‘रेड झोन’मधील ‘टीडीआर’ नियमावलीत बदल करण्यासाठी माजी नगरसेवक पंकज भालेकर गेल्या ५ महिन्यांपूर्वीपासून पाठपुरावा करीत आहेत.

मात्र, नगरविकास विभागाकडे हा विषय नसून, मुद्रांक नोंदणी विभागाशी संबंधित हा विषय आहे. तसे लेखी पत्र दि. २७ जून २०२४ रोजी नगर रचना विभागाने दिले आहे. यापासून श्री. भालेकर पूर्णत: अनभिज्ञ आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याद्वारे योग्य ठिकाणी आणि अचूक विभागाकडे पाठपुरावा केला असता, तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच हा विषय मार्गी लागला असता आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना त्याचा अप्रत्यक्ष फायदा झाला असता, ही वस्तुस्थिती आहे.

दुसरीकडे, महापालिका हद्दीलगत संरक्षण विभागाचा देहू रोड येथे अँम्युनेशन डेपो आहे. त्यापासून २००० यार्डपर्यंत संरक्षण विभागाने प्रतिबंधीत क्षेत्र घोषित केल्याची अधिसूचना दि. २६ डिसेंबर २००२ व दि. २ जून २००४ रोजी शुद्धीपत्रक जाहीर केले आहे. तसेच, दिघी मॅगझीन डेपोपासून ११४५ मीटर अंतर दि. १३ सप्टेंबर १९९० रोजी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. त्यामध्ये दिघी, वडमुखवाडी, भाेसरी, चऱ्होली ही गावे प्रतिबंधीत क्षेत्राने बाधित होत आहेत. आता १०९९ पासून २०१७ पर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्विवाद सत्ता होती. तसेच, २०१४ पर्यंत केंद्रातही आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी सत्तेत होती. पण, त्यावेळी हा प्रश्न सोडवला नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे हा प्रश्न अद्याप सुटलेला नसताना, रेड झोन बाधित नागरिकांच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रकार माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी केला आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून श्री. भालेकर यांचा पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत होते. त्या अडीच वर्षांच्या काळात हा प्रश्न सुटला नाही. पुन्हा महायुतीची सत्ता आली. २०२३ पासून अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री आणि श्री. भालेकर सत्ताधारी पक्षात आहेत. तरीही हा प्रश्न अजून भिजत घोंगडे आहे, ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने पक्षाचा वर्धापन दिन (१० जून) मुंबईत साजरा केला. त्यावेळी ‘‘महायुतीमध्ये बोलताना स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांनी संयम ठेवावा. आपल्या घटक पक्षांतील उमेदवार, नेत्यांबाबत टीका-टीपण्णी करु नये. ज्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण होईल, असे वक्तव्य करु नये.’’ अशा सक्त सूचना केल्या आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेवक पंकज भालेकर महायुतीमध्ये ‘मिठाचा खडा’ टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत अशाच संकूचित वृत्तीमुळे पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. यातून पक्षाचे माजी नगरसेवक काही बोध घेणार आहेत का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भालेकर नक्की कोणासोबत?

राष्ट्रवादी अजित पवार गटातील १६ नगरसेवक शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यात ‘रेड झोन’मधील टीडीआरबाबत चुकीच्या पद्धतीने पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक पहिल्या गाडीने पसार होणार आहेत. त्यामुळे महायुती आणि भाजपाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, अशा संकूचित व उतावीळणाच्या वृत्तीमुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले मुद्दे आणखी जटील झाले आहेत. कालपर्यंत अजित पवार यांचे समर्थक असलेले श्री. भालेकर, आता शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. त्यामुळे श्री. भालेकर नेमके कोणाचे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply