पराग पोतदार: कोरोनाचा धोका जितका मोठा आहे तितकाच त्याच्या नावाने निर्माण होत असलेला सार्वत्रिक संभ्रम आणखीनच मोठा आहे.
कुठल्याच पातळीवर कसलीच नीट स्पष्टता नसणं हे फार विचित्र चित्र सध्या अनुभवायला येते आहे. ‘व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी’ तर हे त्या सगळ्या संभ्रमाला खतपाणी देणारे सर्वांत मोठे साधन!
दिनानाथ रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या नावाने एक मेसेज सध्या सर्वत्र फॉरवर्ड होतो आहे. कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. लोक मात्र त्यामानाने निर्धास्त झालेले आहेत. दररोज हजार दीड हजार रुग्ण कोरोनाबाधित होत असताना आपण कोरोनाचा धोका संपल्यासारखे वागून चालणार नाही. त्यासाठी आपण दक्ष राहणे आवश्यक आहे. अशा आशयाचा जनजागृती करणारा हा मेसेज आहे.
हा मेसेज वाचून पूर्ण होतो न होतो तोच कोरोना नावाचा रोग म्हणजे कसे थोतांड आहे याचा दावा करणारा पाच वेगवेगळ्या डॉक्टरांची नावे असलेला एक मेसेज येऊन धडकला आहे. त्यामध्ये कोरोना हा अगदी साधा आजार असून फक्त घरगुती उपचारांनी कोरोना कसा बरा होतो याची माहिती देणारा हा मेसेज आहे. त्यात लोकांना कसे फसवले जाते, मोठी हॉस्पिटल्स कशी लुबाडणूक करतात हे सांगितले आहे . या दोन्ही मागची काळजी योग्य आहे असे गृहीत धरले तरीही ते मेसेज वाचल्यानंतर पुन्हा संभ्रमापलिकडे आपल्या हातात काहीही पडत नाही.
या सगळ्यांवर कडी करतात वृत्तवाहिन्या. संभ्रमात सातत्याने भर घालण्याचे काम अगदी मन लावून करताना दिसतात. कितीतरी गोष्टी वाढवून चढवून तिथे सांगितल्या जातात.
हा संभ्रम आणि मतमतांतरे विचारवंत, पत्रकार, डॉक्टर्स, आरोग्यतज्ज्ञ, राजकारणी इथपासून ते अगदी जागतिक आरोग्य संघटनेपर्यंत! सामान्य माणूस पुरता गोंधळून न गेला तरच नवल.
कधी मास्क वापरू नका याचे आवाहन करताना अधिकारी दिसतात म्हणून मास्क काढून फिरावं तर पुढच्या चौकात मास्क नाही म्हणून पोलीस पकडतात!
एन ९५ सगळ्यात सुरक्षित मास्त म्हणून सगळीकडे गाजावाजा करतात तर अचानक यातूनसुद्धा कोरोना शिरू शकतो असं सांगून घाबरवून सोडतात.
कधी लॉकडाऊन करून सगळं बंद करून घरी बसवतात तर कधी सगळ्याचीच एकदम सूट देऊन टाकतात.
कधी क्वारंटाईन १४ दिवसांचं ठेवतात, कधी सात दिवसांचं तर कधी चार दिवसांत घरी सोडतात.
एकूणात काय सगळाच संभ्रम!
अशा गोंधळाच्या परिस्थितीत खरोखर आर्थिक कंबरडं मोडलेल्या सामान्य माणसाचं काय होणार हे देवच जाणे..
की कोरोना जाणे?
त्याचाही संभ्रमच!
लेखक : पराग पोतदार, संपादक