मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केले. तो शिवसैनिकाचा राग होता, मात्र ते चुकीचंच होतं. कार्यकर्त्याला समज दिली आहे” अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओवर एका ट्विटराईटने लसीचे कंत्राट कोणाला दिले, असा प्रश्न विचारला होता. त्यावर महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर दिलं होतं.
“ट्विटरवर जे काही लिहिलं ते मी लिहिलं नव्हतं. माझ्या कार्यकर्त्याच्या हातात मोबाईल होता. वांद्रे बीकेसीमध्ये कार्यक्रम सुरु होता, तेव्हा त्याच्या हातात मोबाईल दिला होता. त्या कार्यकर्त्याला मी समज दिली आहे. ते ट्वीट मी त्वरित डिलीट केलं आहे. शिवसैनिक कार्यकर्त्याने तो राग व्यक्त केला, पण ते चुकीचं होतं”असं स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.
“आरोप करणाऱ्यांनी करत राहावे त्यांचं ते काम आहे, सर्व शहानिशा करुनच टेंडर दिल जाईल. दलाल वगैरे काही नाही, सर्व कागदपत्रे तपासून निर्णय घेतला जाईल” असं उत्तर महापौरांनी मनसेच्या आरोपांना दिलं. सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल महापौर पेडणेकरांविषयी संताप व्यक्त केला जात आहे. महापौरांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेले ट्वीट नंतर डिलीट केले असले तरी त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.