महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दणका दिल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणारे, सम आणि विषम तारखांचे नियम मोडणारे दुकानदार यांच्याकडून तब्बल ६१ लाख ९० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
तसेच शहरातील सेव्हन स्टार आणि वोक्हार्ट या दोन रुग्णालयांनी कोरोनाबाधितांना १० लाख ५० हजार रुपये परत केले आहेत. मुंढे यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन तसे ट्विट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुंढेंनी १४ ऑगस्टलाच खासगी रुग्णालयांना इशारा दिला होता.
जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलने एक लाख रुपये, तर वोक्हार्ट रुग्णालयाने नऊ लाख ५० हजार रुपये रुग्णांना परत केले आहेत. राज्य सरकारने कोविडसह विविध आजारांच्या रुग्णांसाठी ठरवून दिलेल्या शुल्काशिवाय जास्त शुल्क आकारणे आणि कोविड रुग्णांसाठी ८० बेडचे आरक्षण धुडकावून लावल्याप्रकरणी सेव्हन स्टारवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
९९१ रुग्णांपैकी केवळ ३०४ रुग्णांकडून वसूल केलेल्या शुल्काची माहिती सेव्हन स्टारने पालिकेला दिली. परंतु ६८७ रुग्णांकडून वसूल केलेल्या शुल्काची माहिती दडविल्याचेही पुढे आले. याबाबतही आयुक्तांनी रुग्णालयाला स्पष्टीकरण मागितले होते. परंतु सेव्हन स्टार रुग्णालयाने समाधानकारक उत्तर न दिल्याने आयुक्तांनी दंड ठोठावला. वोक्हार्ट हॉस्पिटलला रुग्णांकडून उकळलेले अवाजवी साडेनऊ लाख रुपये परत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार वोक्हार्टने रुग्णांना उकळलेले अवाजवी शुल्क परत केले आहे.