कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज साताऱ्याचा दौऱ्यावर आहेत. कराडमध्ये राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना आढावा बैठक घेतली मात्र या बैठकीला साताऱ्यातील दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले गैरहजर आहेत.
शरद पवारांचा मागील काही दिवसांमधील हा दुसरा सातारा दौरा आहे. माजी मुख्यमंत्री आणि कराडचे काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. तर साताऱ्यात मोठे प्रस्थ असलेले राज्यसभा खासदार उदयनराजे भोसलेही गैरहजर आहेत. यापूर्वी सातारा जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीलाही उदयनराजे उपस्थित राहिले नव्हते.
कराडमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाऊन हॉलमध्ये ही बैठक होत आहे. राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत कोरोनासह सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पूर परिस्थितीचाही आढावा घेतला जाणार आहे.