बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबत सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने महाराष्ट्र सरकार, बिहार सरकार आणि सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांना 3 दिवासात आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले. याशिवाय कोर्टाने महाराष्ट्र सरकारला या प्रकरणाच्या तपासाचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर या प्रकरणावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी भाष्य केले आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबत घडलेल्या घडामोडी अत्यंत क्लेशदायक आहेत, दोन राज्यातील पोलिसांमध्ये सुरु असलेली विधाने भारत-पाक युद्धासारखी वाटतात, अशा भावना ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केल्या आहेत.
“सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहचले आहे. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये असे पहिल्यांदाच घडत आहे. दोन राज्यांचे पोलीस अशाप्रकारे विधाने करत आहेत, की जसे काही हे भारत आणि पाकिस्तानचे युद्ध आहे. अशा प्रकारच्या स्थितीमुळे या देशाचा नागरिक म्हणून मला अत्यंत दुःख होत आहे, असे उज्ज्वल निकम म्हणाले.