मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर पत्रातून केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या गंभीर आरोपावरून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती, ज्यावर मुंबई हायकोर्टाने काल निकाल देताना, राज्याच्या गृहमंत्र्यांची तातडीने प्राथमिक सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या निकालानंतर, काल गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून, तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला.
दुसरीकडे, राजीनाम्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. काल राजीनाम्यानंतर माजी गृहमंत्री तातडीने दिल्लीला पोहोचले. त्यांनी रात्री उशिरा ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर सर्वच स्तरांतून अशी शक्यता वर्तवली जात होती. या वृत्ताला आज नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडूनही दुजोरा मिळाला. वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, ‘मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याची माहिती दिली.
त्याप्रमाणे, या निर्णयाला आव्हान देण्यासाठी ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच सरकारपाठोपाठ अनिल देशमुखांनी देखील मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देत याचिका दाखल केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
Maharashtra Government moves Supreme Court challenging the Bombay High Court order in which it ordered the CBI probe against former Home Minister, Anil Deshmukh, for his alleged involvement in corruption, levelled by former Mumbai Police Commissioner Param Bir Singh
— ANI (@ANI) April 6, 2021
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ठाकरे सरकार, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानेच, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी याचिकाकर्त्या अॅड. जयश्री पाटील यांनी आधीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केली आहे.