मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सातत्याने तिच्या समाज माध्यमांवरील पोस्ट आणि ट्वीटवरून चर्चेत आणि वादात असते. देशातल्या प्रत्येक सामाजिक आणि राजकीय विषयावर कंगना जाहीरपणे आपली मतं व्यक्त करताना दिसते.
सध्या बंगालच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिने टीएमसीविरोधात अनेक प्रकारचे ट्विट केले होते. हे ट्विट्स समाज माध्यमांवर देखील प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, प.बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाले, ज्यानंतर तिथे परत हिंसाचाराला सुरुवात झाली.
या पार्श्वभूमीवर, अभिनेत्री कंगना रनौतने काही ट्विट्स केले होते, ज्यामुळे आता तिचे ट्विटर हँडल ट्विटरकडून सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
कंगनाने तिच्या ट्विटमध्ये, ‘मी चूक होते, ती रावण नाही. रावण तर सर्वोत्कृष्ट राजा होता, त्याने जगातला सर्वोत्कृष्ट देश बनवला, एक महान प्रशासक, अभ्यासक आणि वीणावादक होता आणि आपल्या प्रजेचा राजा होता. ती एक रक्तपात करणारा राक्षस आहे. ज्या लोकांनी त्यांना मतदान केले आहे, त्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत.’ असे वादग्रस्त विधान केले होते.
कंगनाच्या अकाऊंटवर ट्विटरने केलेल्या कारवाईमुळे तिचे चाहते नाराज झाले असून, याबाबत त्यांच्याकडून समाज माध्यमांवर निषेध व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे ट्विटरने कंगनावर केलेल्या या कारवाईमुळे काही लोक खूश असल्याचे चित्र दिसत आहे.