IMPIMP

“नितीन राऊतांनी शब्द पाळला नाही तर आंदोलनाचं हत्यार उपसू”

मुंबई  : नितीन राऊत यांनी शब्द पाळला नाही तर आंदोलनाचं हत्यार उपसू असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे.  महावितरणमधील उपकेंद्र सहाय्यक, पदवीधारक शिकाऊ अभियंता या पदाकरिता भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. 
 
ही भरती प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहुन सर्व प्रवर्गातील उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग वगळून नियुक्ती आदेश देण्यात येतील आणि अशा उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल, अशी जाहिरात महावितरणकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावरुन शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना इशारा दिला आहे. 
 
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भरती प्रक्रियेबाबत मराठा समाज नाराज नसल्याचं म्हटलंय. मराठा समाजाच्या काही मुलांना ओपनमध्ये तर काहींना SEBC मध्ये सामावण्यात आलं असल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे मराठा समाज महावितरणच्या भरती प्रक्रियेबाबत नाराज नसल्याचं म्हटलंय. त्यावर नितीन राऊत यांनी शब्द पाळला नाही तर आंदोलनाचं हत्यार उपसू असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे. तसंच भरती प्रक्रियेतील उमेदवारांना सावध पवित्रा घेण्याचं आवाहनही मेटे यांनी केलं आहे.