मुंबई – विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ‘सचिन वाझे यांना कोण वाचवत आहे?’ असा थेट सवाल आज विधानसभेत विचारला. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या संशयीत कारचा सचिन वाझे तपास करत आहेत.
या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा आरोपही सचिन वाझेंवर देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तसेच त्यांच्या अटकेची मागणी देखील केली आहे. या अगोदरही अनेकदा सचिन वाझे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले आहेत.त्यामुळे येत्या काळात सचिन वाझे वरून राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
कोण आहेत सचिन वाझे?
सचिन वाझे यांचं पूर्ण नाव, सचिन हिंदूराव वाझे. सचिन वाझे मुळचे कोल्हापूरचे. सचिन वाझे यांची 1990 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाली. तेव्हापासून वाझे यांचा पोलीस दलातील प्रवास सुरू झाला. सचिन वाझे हे गेल्यावर्षी तब्बल 16 वर्षांनी पोलीस दलात परतले. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना घरात घुसून उचलणारे अधिकारी सचिन वाझे हेच होते.
सचिन वाझे यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे.
मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. वाझेही या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते.
2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर 2008 च्या दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले. सचिन वाझे यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर ‘जिंकून हरलेली लढाई’ नावाचे पुस्तक मराठीत लिहिले होते. शीना बोरा हत्या प्रकरण आणि डेविड हेडली यांच्यावरही त्यांनी पुस्तकं लिहिली.
सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेवलपर म्हणूनही त्यांनी काम केलं. वाझेंनी एक अॅपही तयार केले होते. ते एका एनजीओ संबंधित कामही करायचे. गरजू लोकांना कायदेशीर मदत देणे हे या स्वयंसेवी संस्थेचे काम होते.