पुणे : विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मोठी खलबतं सुरू असून, पिंपरी-चिंचवडमध्ये उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे तगदा लावला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. राज्यातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे.
भाजपाने पाच उमेदवारांची यादी घोषित केली आहे. त्यानुसार, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि प्रा. राम शिंदे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून सचिन आहिर आणि आमशा पाडवी यांना संधी देण्यात येणार आहे. मात्र, इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे राष्ट्रवादीने अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही.
दरम्यान, दि. ९ जून रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्यामुळे राष्ट्रवादी कोणाला संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले. पिंपरी-चिंचवडमधून माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, माजी महापौर संजोग वाघेरे यांच्यासह माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी आपआपल्या परीने पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावला आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. त्यानंतर २० जूनला विधान परिषदेच्या १० जागासांठी मतदान होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील एका गटाची मागणी विधान परिषद मिळावी अशी आहे.
आजची रात्र वैऱ्याची…आता नाही, तर कधिच नाही…
दरम्यान, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर आणि पिंपरी-चिंचवडमधून माजी आमदार विलास लांडे यांचे नाव आघाडीवर आहे. या तिघांपैकी दोघांना संधी देण्याबाबत खल सुरू आहे. खडसे आणि लांडे यांच्यापैकी एकाला आपल्या महत्त्वाकांक्षेवर पाणी सोडावे लागणार असून, आता नाही, तर केव्हाच नाही, अशा भूमिकेतून दोन्ही नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दुसरीकडे, योगेश बहल, संजोग वाघेरे, मोरेश्वर शेडगे आणि मंगला कदम यासुद्धा ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यामुळे राजकीय विश्वाचे लक्ष राष्ट्रवादी उद्या कोणाला संधी देणार? याकडे लागले आहे.