नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांना हटवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यानुसार त्यांनी उत्तराखंडचे राज्यपाल बेबी राणी मौर्य यांची भेट घेत आपला राजीनामा त्यांना सादर केला. मुख्यमंत्र्यांची नियुक्त होत नाही तोवर त्यांच्याकडेच कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यावर भाजपचे अनेक नेते आणि आमदार नाराज असल्याची चर्चा होती. त्यानुसार, उत्तराखंडमधील नेतृत्व बदलण्याचा निर्णय भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना घेतला. राजीनामा देण्याआधी त्रिवेंद्र सिंह रावत यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची देखील भेट घेतली होती.
रावत यांना त्यांच्या राजीनाम्याविषयी विचारले असता, ते म्हणाले की, भाजपमध्ये जे कोणते निर्णय घेतले जातात ते सामूहिक विचारानंतरच घेतले जातात. याबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला दिल्लीला जावं लागलं. तुम्हाला हा प्रश्न पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला विचारावा लागेल.
रावत यांच्या राजीनाम्यामागे आमदारांची नाराजी असल्याचे सांगितले जाते. काही मंत्री आणि जवळपास 20 आमदार रावत यांच्या कामाच्या पद्धतीवर नाराज होते. आमदार आणि मंत्र्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे यासंदर्भात तक्रार देखील केली होती, असे सांगितले जाते. विकास कामांच्या मंदावलेला वेग यामुळेही नाराजी होती. चारधाम देवस्थान मॅनेजमेंट बिल आणि उत्तराखंडमध्ये तिसरा कमिशनर बनविण्याचा निर्णय देखील राजीनाम्यामागे असल्याचे सांगितले जाते. चारधाम देवस्थान मॅनेजमेंट बिलाद्वारे सरकारी हस्तक्षेपामुळे मंदिरांमध्ये अधिक चांगली व्यवस्था पुरवणं शक्य आहे, असे रावत यांचे म्हणणे होते. मात्र इतरांचा याला विरोध होता.
आमदारांच्या तक्रारीनंतर भाजप उपाध्यक्ष रमन सिंह आणि सरचिटणीस व राज्याचे प्रभारी दुष्यंत गौतम हे कोणताही नियोजीत कार्यक्रम नसताना देहरादूनला पोहचले आणि राज्याच्या कोर कमिटीतील नेत्यांसोबत बैठक केली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री रावत यांनाही या बैठकीबाबत कल्पना नव्हती, असं सांगण्यात येत आहे. या बैठकीनंतर अहवाल भाजप अध्यक्ष नड्डा यांच्याकडे सोपवला होता. रावत यांनी जेपी नड्डा यांची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली होती. मात्र, अखेर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
रावत यांच्यानंतर मुख्यमंत्रीपद कोणाकडे ?
त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत राज्यसभेचे खासदार अनिल बलूनी, नैनीतालचे लोकसभेचे खासदार अजय भट्ट आणि धनसिंग रावत उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे आहेत.