IMPIMP

राष्ट्रवादीचा अजून एक शिलेदार अजित पवारांना धक्का देणार ? शरद पवार गटात जाणार का ?

चिंचवड : लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीत विद्यमान आमदारांना पुन्हा निवडणुकीचं तिकीट मिळणार असे सुत्र ठरले असताना आता इच्छुक उमेदवारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. यातच भोसरी विधानसभेप्रमाणे चिंचवड विधानसभा मतदारसंघात देखील अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याठिकाणी नाना काटे यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा विचार केल्याने सध्या अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

चिंचवड मतदारसंघात विद्यमान आमदार अश्विनी जगताप असून त्यांना पुन्हा याठिकाणी तिकीट मिळण्याची शक्यता आहे. याठिकाणी भाजपचेच शहराध्यक्ष शंकर शेठ जगताप यांनी देखील भाजपच्या विरोधात दंड थोपटले असताना याच वेळी अजित पवार गटातील नाना काटे देखील याठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे चिंचवडच्या जागेचा महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे.

दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत चिंचवडची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. परंतु याठिकाणी शरद पवार गटात पाहिजे तसा दमदार उमेदवार दिसत नाही. त्यामुळे याठिकाणी शरद पवार गट आपला उमेदवार दुसरीकडून आयात करणार ही शक्यता नाकारता येत नाही. अशातच भोसरी विधानसभा मतदारसंघातुन इच्छुक असलेल्या अजित पवार गटातील अजित गव्हाणे यांनी अलिकडेच शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे की, नाना काटे देखील शरद पवार गटात प्रवेश करणार. यावर नाना काटे यांना विचारले असता. त्यावेळी ते म्हणाले की, सध्या तरी कोणताही निर्णय घेतला नाही. याठिकाणी मी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. अजित पवारांनी देखील मला काम करण्यास सांगितले आहे.

यातच महायुतीत विद्यमान आमदार ज्यांचा असेल त्यांना जागा सुटेल अशी चर्चा आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, सध्या चिंचवड मधून विद्यमान आमदाराने दावा सांगितला आहे. परंतु त्याठिकाणी शहराध्यक्ष देखील इच्छुक आहेत. त्यांच्यात सध्या मोठा संघर्ष बघायला मिळतो. यदाकदाचित हा वाद सोडवण्यासाठी ही जागा आमच्याकडे आली तर आम्ही लढवणार अशी प्रतिक्रिया नाना काटे यांनी दिली आहे.

शरद पवार यांनी आँफर दिली तर तुम्ही स्विकारणार का ? या प्रश्नावर देखील नाना काटे यांनी भाष्य केले आहे. जागेसंदर्भात अजित पवार यांच्याशी बोललो आहे. त्यांनी मला काम करण्यास सांगितले आहे. परंतु जागा जरी मिळाली नाही तरी मी चिन्हावरच निवडणूक लढणार. अस नाना काटे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply