नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपाकडूनही वाढदिवसाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आजचा दिवस बेरोजगारी दिवस म्हणून पाळला आहे. गुरुवारी मेरठच्या आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर समाजवादी युवजन सभेच्या कार्यकर्त्यांनी हातात कटोरा घेऊन आंदोलन केले. देशातील युवक बेरोजगार आहे, तरुणांच्या हाताला काम नाही. देशातील युवा नोकरी मागत आहे, पण सरकारने या तरुणांच्या हातात कटोरा दिलाय, अशी घोषणाबाजी युवकांनी केल्याचे दिसून आले.
काँग्रसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ट्विट करुन, देशातील युवक आज राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करत असल्याचे म्हटले. रोजगार हा सन्मान आहे, सरकार कधीपर्यंत हा सन्मान देण्यापासून मागे राहणार आहे? असा प्रश्नही राहुल गांधींनी ट्विटरवरुन विचारला आहे.