भोपाळ : एखाद्या पक्षातील अंतर्गत वादाला कंटाळून किंवा मोठी जबाबदारी मिळत नसल्याने नेतेमंडळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात, ही काही आता नवीन बाब राहिलेली नाही. दुसऱ्या पक्षात देखील अशा नेत्यांना त्वरित जबाबदारी दिली जाते. मात्र मध्य प्रदेशमध्ये एक नवीनच प्रकार समोर आला आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेसने पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका नेत्याचीच थेट सरचिटणीस पदी निवड केली आहे. काँग्रेसच्या या गोंधळलेल्या कारभाराची आता खिल्ली उडवली जात आहे.
मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते हर्षित सिंघई यांनी काही दिवसांपुर्वी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकानंतर त्यांना सरचिटणीस पदी निवडण्यात आले. हर्षित सिंघई यांना नवी जबाबदारी मिळाल्याबद्दल अनेकांनी शुभेच्छा देणारे संदेश आल्यानंतर काहीवेळासाठी ते देखील गोंधळ गेले.
हर्षित सिंघई यांनी सांगितले की, मार्च महिन्यातच त्यांनी ज्योदिरादित्य सिंधिया यांच्यासोबत काँग्रेस पक्ष सोडत भाजपात प्रवेश केला होता. तीन वर्षांपूर्वी मी युथ काँग्रेस निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दिला होता. निवडणुकीत रस नव्हता आणि माझी सरचिटणीसपदी निवड झाली.
युथ काँग्रेस संपूर्ण मध्य प्रदेशात हेच करत आहे. जे पक्षात नाहीत त्यांनी निवडून आणत आहे, असा टोला देखील सिंघई यांनी लागवला. तर दुसरीकडे युथ काँग्रसने हर्षित सिंघल जाणुनबुजून पक्षाची बदनामी करत असल्याचा आरोप केला आहे.