मुंबई : कालपासून राज्य विधीमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, सत्ताधारी-विरोधी पक्षांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे हा दिवस गाजला. अधिवेशन सुरू असल्याने विधान भवनाचा परिसर मंत्री, त्यांच्या गाड्यांचा ताफ्याने गजबजलेला असतो. मात्र या अधिवेशानाच्या पहिल्या दिवसानंतर एक वेगळीच घटना विधानसभा भवनापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मरीन ड्राइव्हवर घडली.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे मरिन ड्राइव्हवर वॉकसाठी गेले असता, काही तरूणांनी त्यांना त्यांचा फोटो काढण्याची विनंती केली. विशेष म्हणजे भरणे यांनी देखील कोणतेही आढेवेडे न घेता तरुणांचे फोटो काढले.
दत्तात्रय भरणे मरीन ड्राईव्हवर इव्हनिंग वॅाक करण्यासाठी बाहेर पडले होते. यावेळी गप्पा मारत बसलेल्या तरूणांनी थेट “ओ काका आमचा एक फोटो काढा की,” असे म्हणत, थेट दत्तात्रय भरणे यांना फोटो काढण्याची विनंती केली. यानंतर तरुणांच्या विनंतीनंतर भरणे यांनी देखील तरूणांचे फोटो काढले.
तरूणांना अखेर दत्तात्रय भरणे हे कोण आहेत हे समजल्यानंतर त्यांच्यासोबत देखील फोटो काढण्याची विनंती केली. भरणे यांनी हा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे.