पुणे – आजकाल जिल्हा, तालुका , गाव पातळीवर देखील राजकारणाचे स्वरूप बदलले आहे. ज्याला त्याला फक्त पैसे आणि खुर्ची साठी राजकारण करायचं असतं. आणि त्यासाठी पाहिजे असते प्रसिद्धी. आणि या प्रसिद्धी साठी कोण काय करेल ते सांगता येत नाही. आत हेच बघा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अशाच एक प्रसिद्धीचा हटके फंडा समोर आला आहे.
जुन्नर तालुक्यात एका राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याने तब्बल १२५ फूट आकाराचा भव्यदिव्य बॅनर झळकवला आहे. तसेच यापुढील आश्चर्य म्हणजे त्यावर ६ हजार ५०० समर्थकांचे फोटो छापले आहे.त्यामुळे हा बॅनर परिसरात चर्चेचा विषय ठरतो आहे.
स्थानिक पातळीवरील पब्लिसिटी स्टंट असल्याचे पण बोलले जात आहे. तसेच बॅनरवर राजकीय वजन दाखवण्यापेक्षा सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटायला हवा असे मत देखील काही नागरिक व्यक्त करत आहे.
हल्ली राजकारणात पक्षनिष्ठा, संयम, शिस्त वगैरे हे सगळे शब्द भाषणापुरते मर्यादित राहिले आहे. आदल्या रात्री एखाद्या पक्षाचा कट्टर कार्यकर्ता उद्या विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर दिसला तर नवल वाटत नाही. प्रत्येकाला कमी वेळेत साहेबांच्या मर्जीतले होऊन आपले राजकीय स्थान मजबूत करायचे आहे. त्यामुळेच जो तो आपल्या कार्यकर्त्यांची मने जपण्याचा प्रयत्न करत असतो.