बीड: बिडमध्ये शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांनी पोलिसांनची परवानगी नसताना सुद्धा काल शनिवारी मराठा मोर्चा काढण्यात आला होता. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांसह तब्बल अडीच ते तीन हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विनायक मेटे यांनी ठाकरे सरकार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.
अशोक चव्हाण यांच्यासारखा नाकर्ता माणूस आजपर्यंत झालेला नाही. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा बापट आयोगाच्या शिफारशी फेटाळण्याची मागणी आम्ही केली होती. पण त्याकडे अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केलं. २०१४ ला सुद्धा जे आरक्षण दिले ते ही चुकीचे दिले, त्याची फळे आज आपण भोगतोय. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आरक्षण अतिशय चांगलं होते. पण या माणसाच्या मुर्खपणामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे घालवलं, असा घणाघाती आरोपही मेटे यांनी यावेळी केलाय.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला दिले गेलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा काढण्यात आला आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आली होती. तरीदेखील बीडमध्ये निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता. तरी सुद्धा विनायक मेटे यांनी मोर्चा काढला.