सातारा : साताऱ्यातील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे दर्जेदार सुशोभिकरणासाठी लागणारा दुस-या टप्यातील अडीच कोटींचा निधी तसेच महाराणी ताराराणी यांच्या समाधी स्मारकासाठी आणि शाहु नगरीतील ऐतिहासिक वास्तुंच्या सुशोभिकरणासाठी जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
उदयनराजे भोसलेंकडून स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केल्याची माहिती उदयनराजे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकास साजेसा पुतळा पोवईनाका येथे आहे. या परिसराचे सुशोभीकरण आणि चबुतऱ्याची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील कामास सुमारे अडीच कोटी रुपये आवश्यक आहेत. ही तरतूद जिल्हा नियोजन समितीतून तातडीने करण्यात यावी, याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी तथा नियोजन समितीचे सदस्य सचिव शेखर सिंह यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची त्वरित दखल घेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे.