मुंबई : मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तूर्तास मागे घेण्यात आला आहे. मात्र या आरक्षणावरून आघाडीतच बेबनाव असल्याचं उघड झालं आहे. पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत आमनेसामने उभे ठाकल्याचं चित्रं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी चिडून उत्तर दिल्याने पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून धुसफूस असल्याचं अधोरेखित झालं आहे. यावरून भाजपचे ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी निशाना साधला आहे.
योगेश टिळेकर म्हणाले, अजितदादा, तुमच्या तिघाडीतल्या बिघाडीत बिचाऱ्या सामान्य जनतेची कशाला हेळसांड करताय. मागासवर्गीय समाजाच्या पदोन्नती आरक्षणासारख्या विषयात देखील जर तुमच्या-तुमच्यात एकमत नसेल तर काय उपयोग तुमच्या आघाडीचा?, असा प्रश्न देखिल त्यांनी उपस्थित केला आहे.
पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत आमनेसामने झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांना नितीन राऊत यांच्या विधानबाबत विचारण्यात आलं. त्यावर मला नितीन राऊत यांनी काय वक्तव्य केलं त्याबाबत माहीत नाही. जीआरबाबतही मला माहीत नाही. त्यांनी काय सांगितलं ते मला माहीत नाही, असं पवार चिडून म्हणाले. पवार चिडल्याचं पाहून पत्रकारही क्षणभर अवाक् झाले. यावरून भाजपचे ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी निशाना साधला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने शासकीय सेवेतील पदोन्नतीसंदर्भात, पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना ३३% जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता. मात्र याला मागासवर्गीयांमधून होत असलेला तीव्र विरोध लक्षात घेऊन ७ मे रोजी जीआर काढून जारी करण्यात आलेल्या या निर्णयाला, बुधवारी राज्य सरकारने तूर्त स्थगिती दिली.