चंद्रपूर : कोरोना महामारीच्या लढ्यात अनेक जण आपला जीव धोक्यात घालून लोकांसाठी काम करत आहे. मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून सुद्धा कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले नसल्याचे पाहायला मिळत आहे. चंद्रपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या महिलांनी वेतन थकवल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. मात्र, या महिलांचे ऐकूण घेण्याऐवजी दोन्ही मंत्र्यांनी काढता पाय घेतला.
सोशल मीडियावर या प्रकरणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. भाजप नेते संजय कुटे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच, महाराष्ट्राला तर वार्यावर सोडलंच आहे आता आपल्या कोविड योध्यांना पण सोडलंय, अशा शब्दात कुटे यांनी या दोन्ही नेत्यांवर टीका केली.
कॅबिनेट मंत्री अमित देशमुख, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार कोरोना योध्यांना थकीत वेतनाचे उत्तर न देता प्रेस कॉन्फरंस सोडून पळ काढला.
महाराष्ट्राला तर वार्यावर सोडलंच आहे आता आपल्या कोविड योध्यांना पण सोडलंय.@BJP4Maharashtra @OfficeofUT pic.twitter.com/PdGfbT9LHV— Dr.Sanjay Kute- डॉ.संजय कुटे (@DrSanjayKute) April 29, 2021
चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात काही कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. या कर्मचाऱ्यांचे अनेक दिवसांपासूनचे वेतन देण्यात आलेले नाही. याच्या विरोधात कर्मचारी आंदोलक डेरा आक्रोश आंदोलन करत आहेत.
अमित देशमुख आणि विजय वडेट्टीवार चंद्रपूर दौऱ्यावर असताना आंदोलक महिलांना त्यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. मात्र, दोन्ही नेते पत्रकार परिषद सोडून निघून गेल्याचे पाहायला मिळाले.