पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे कथित गोळीबार प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. कंत्राटदार अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारसह तिघांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने आमदार आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. तर आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या पीएसह २१ जणांवर अपहरण आणि जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप तानाजीने केला आहे. या प्रकरणी तानाजीच्या पत्नी सविता पवार यांनी राज्याच्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ‘माझ्या पतीला न्याय द्या’ या मागणीचे निवेदन दिले आहे.
सविता पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझे पती तानाजी पवार हे (माजी सैनिक, भारतीय सैन्यदल) अँटनी वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीत व्यवस्थापक या पदावर गेली २ वर्ष झाले कार्यरत आहेत. त्यानिमित्ताने सातत्याने स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून वारंवार विविध कारणासाठी तानाजीला त्रास देणे सुरू असायचे. त्यातच दोन दिवसांपासून कोणत्या तरी तणावाखाली असल्याची चाहूल मला लागली होती. परंतू, लहान मुलं असल्याकारणाने त्यांनी मला सांगण्याचे टाळले. त्यातच मला कळाले की ११ मे रोजी त्यांच्या कार्यालयात तीन कर्मचाऱ्यांना गंभीर बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर दोन दिवस सावटाखाली गेले.
१२ मे रोजी दुपारच्या सुमारास झालेला प्रकार मिटवण्याच्या उद्देशाने स्थानिक आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाकरवी अपहरण करून जीवे मारण्याच्या उद्देशानेच जनसंपर्क कार्यालयात मारहाण केल्यानंतर माझे पती तानाजी पवार यांनी स्वत:चा जीव वाचवण्याच्या उद्देशाने परवानाधारक पिस्तूलाने हवेत गोळीबार केला. माझे पती निर्दोष आहेत. त्यांना लवकरात लवकर न्याय द्या, असे सविता पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
पिंपरी-चिंचवडमधील कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराला सत्तेचा गैरवापर करीत ‘ब्लॅकमेलिंग’ करणाऱ्या आमदारांनी प्रकरण अंगलट येण्याची भिती निर्माण झाल्यावर स्वत:वर गोळीबार केल्याचा कांगावा केल्याचे दिसत आहे. याच प्रकरणात पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आणि पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुंबईतील प्रथितयश असलेली ए.जी. एनव्हायरो कंपनीकडे कचरा संकलनाचे काम आहे. या कंपनीचे शहरातील इनचार्ज माजी सैनिक तानाजी पवार आहेत. आपल्या मर्जीतील मुलांना कामावर न येता पगार चालू करा, कचरा संकलनासाठी आमच्या गाड्या घ्या यासह पैशाची मागणी करीत आमदार बनसोडे यांनी तानाजी पवार यांना धमकावले होते. गेल्या १५ दिवसांपासून हा विषय चर्चेत होता.