पिंपरी-चिंचवड – पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या प्रचारार्थ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पिंपरी-चिंचवड मध्ये दाखल झाले होते यावेळी त्यांनी पदवीधर निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विक्रमी मतदार नोंदणी केली आहे. ‘टीम पिंपरी-चिंचवड’ची तयारी उल्लेखनीय आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, भाजपाचा या निवडणुकीमध्ये विजय निश्चित आहे, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.तसेच आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांचे देखील कौतूक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उमेदवार संग्राम देशमुख, महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी सभापती संतोष लोंढे, राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, सदाशिव खाडे, माजी महापौर राहूल जाधव आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी पिंपरी-चिंचवड कार्यकारिणीच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले “कोरोना संकटाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने विविध योजना हाती घेतल्या. ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना मदत देण्याचा प्रयत्न केला आहे.”
तसेच प्रदेश कार्यालयातून आलेल्या प्रत्येक सूचनांचे आणि कार्यक्रमांची आम्ही अंमलबजावणी केली आहे. प्रत्येक कार्यकर्ते, नगरसेवकांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. कोरोना काळात शहरातील नागरिकांना मदतीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. शहरातील १३ शाळांमध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी ३२ प्रभागातील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी नियोजन केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये जास्तीत-जास्त मतदान भाजपाच्या उमेदवारांना होणार आहे. ते मतदान निर्णायक असेल, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी दिला आहे