पुणे : राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी खोचत टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. थेट शरद पवारांवर निशाणा साधल्यानंतर अजित पवार यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चंद्रकांत पाटलांवर टीका करताना तुटून पडले. आता आपल्या वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
शरद पवार यांचा मला अनादर करायचा नव्हता. त्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते पुण्यात बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, काही नेते राज्यातील प्रश्नांवर बोलताना दिसले नाहीत. पण माझ्यावर टीका करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला. आम्हाला चंपा, टरबुजा बोललेलं कसं चालतं? पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केलेली कशी चालते? असा सवाल त्यांनी केला.
राजकारणात अशा टीका होतच असतात. मी कोणत्याही ट्रोलिंगला घाबरत नाही, असेही ते म्हणाले.