पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला पुण्यात आढावा बैठक घेताना दिसतात. परंतु “मुख्यमंत्री ‘मातोश्री’बाहेर पडत नाहीत, राज्याच्या दौऱ्यावर जात नाहीत” अशी तक्रार भाजपकडून सातत्याने होत आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या म्हणजेच ३० जुलै रोजी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर जाणार आहेत.
मात्र, “मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे”, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. “पुण्याची परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा केवळ दिखाव्यासाठी आहे”, असा आरोप जगदीश मुळीक यांनी केला
“पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असल्यानं राज्य सरकारकडून भेदभाव केला जातोय. महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 200 कोटींचा खर्च केला. मात्र राज्य सरकारने केवळ तीन कोटी रुपयांची मदत केली. मुख्यमंत्र्यांनी केवळ बैठकीचं नाटक न करता 500 कोटींची मदत जाहीर करावी”, असा घणाघात जगदीश मुळीक यांनी केला.