कल्याण : भाजपचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात झाला, या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आमदार कथोरे यांच्या मणक्याला दुखापत झाल्याने, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आमदार कथोरे कल्याण तालुकातील अनखर पाडा येथील रस्त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आटोपून बदलापूरकडे येत असताना संध्याकाळी पावणे सातच्या सुमाराला हा अपघात झाला. कथोरे यांचे वाहन आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. यात एक तरुण आणि एक तरुणी असे दोघांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात आमदार किसन कथोरे थोडक्यात बचावले आहेत. अपघात इतका भीषण होता की गाडीची एअर बॅगही फुटली. अपघातात दुचाकीवरील दोघे जण जवळपास 10 फूट लांब फेकले गेले.
या अपघातात कथोरे यांच्या गाडी चालकाला किरकोळ दुखापत झाली. तर कथोरे यांचे अंगरक्षक माळी, स्वीय साहाय्यक महेश सावंत हे सुखरूप आहेत.