पुणे : 2022 मध्ये होणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. पुणे शहर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी भाजप खासदार गिरीश बापट यांनी आगामी निवडणुकीत भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
नगरसेवकांच्या बैठकीत त्यांच्याकडून विविध विकासकामांची, उभा राहिलेल्या प्रकल्पांची तसंच अर्धवट अवस्थेत असलेल्या प्रकल्पांची माहिती बापट यांनी घेतली. या बैठकीला खा. बापट, पुणे शहर भाजपाध्यक्ष जगदिश मुळिक, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे आदी नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना बापट म्हणाले की, भाजपचे सर्व नगरसेवक चांगले काम करत आहेत. राज्यात भाजपची सत्ता असताना पुण्यात मोठ्याप्रमाणावर निधी दिला. केंद्र सरकारच्या माध्यमातूनही शहरात मोठे प्रकल्प सुरू आहेत. भाजपने पुणेकरांना दिलेला शब्द पाळला असल्याने, आगामी निवडणुकीमध्ये भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक महापालिकेत असतील.
कोरोनाचे संकट असतानाही महापौर आणि नगरसेवकांनी चांगले काम केले असल्याचे म्हणत बापट यांनी नगरसेवकांचे कौतुक केले.
भामा आसखेड प्रकल्पातील शेतकर्यांचे पुनर्वसन केले. यासाठी महापालिकेने सुमारे २०० कोटी रुपये निधी दिला. विमानतळ, नदी सुधार योजना, मेट्रो प्रकल्पाची कामे पुढे नेली. पुणेकरांना दिलेला शब्द आम्ही पाळणार. परंतु यावेळी पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.