तुळजापूर – ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ म्हणत तुळजाभवानी मंदिर परिसरात भाजप आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांच्या नेतृत्वात बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडीनं पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे.
‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलं आहे. साधू-संतांचा आवाज ऐकायला हे सरकार तयार नाही. साधू-संतांशी चर्चा करा म्हणून दोन वेळा पत्र पाठवली. पण हे सरकार झोपी गेल्याचं सोंग आणत आहे’, अशी टीका तुषार भोसले यांनी केली. भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटीलही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
राज्यात आजपासून सिनेमागृह, जलतरण तलाव आदींना परवानगी देण्यात आली आहे. तर हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार यापूर्वीच सुरु झाले आहेत. अशावेळी राज्यातील मंदिरं बंद का? असा सवाल भाजप, विविध मंदिर समित्या आणि राज्यभरातील साधू-महंतांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, भाजप आध्यात्मिक आघाडीच्या आंदोलनाला तुळजापूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण तरीही तुषार भोसले आणि राज्यातील साधू-महंतांच्या नेृत्वात हे आंदोलन सुरु करण्यात आलं. मंदिराच्या मुख्य दरवाजावर तुळजाभवानीच्या प्रतिमेची आरती करण्यात आली. त्यानंतर या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
Read also –
राज्यात चित्रपटगृहे , नाट्यगृहे आजपासून सुरु , सरकारचा निर्णय