मुंबई : शिवसेनेचे नागपूर उपजिल्हाप्रमुख आणि नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी तुकाराम मुंढेंची बदली रद्द करून पुन्हा नागपुरात नियुक्त करण्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
‘नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अथक प्रयत्न करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नाही. आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली आहे. तुकाराम मुंढे महापालिका आयुक्त असताना नागपुरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. त्यामुळे त्यांची पुन्हा नागपुरात आयुक्त म्हणून बदली करा’, असं किशोर कुमेरिया यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, मुंढे यांच्या बदलीनंतर नागपूर आयुक्तपदाचा कार्यभार राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांची नागपूर आयुक्तपदाची कारकीर्दही नेहमीप्रमाणे चर्चेत राहिली. त्यांनी कोरोनाकाळात कठोर निर्णय घेतले. नागपुरात आयुक्तपदावर कार्यरत असताना तुकाराम मुंढे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. 26 ऑगस्ट रोजी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. त्यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सचिवपदी झाली. मात्र अवघ्या 15 दिवसात त्यांची बदली रद्द झाली. त्यामुळे त्यांच्या नव्या नियुक्तीची उत्सुकता सर्वांना आहे.