IMPIMP
bmc bmc

काँग्रेसने सरकारमधील फूट टाळली, शिवसेनेला दिला मोठा मान

 मुंबई : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर आता स्थानिक निवडणुकीतही तिन्ही पक्ष एकत्र येत असल्याचे चित्र आहे. अहमदनगर पालिकेनंतर आता मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीत एक पक्ष दुसऱ्या पक्षासाठी माघारी घेणार आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या वतीने असिफ झकेरिया हे स्थायी समितीसाठी तर संगीता हांडोरे यांनी शिक्षण समितीसाठी अर्ज भरला होता. काँग्रेसनेच उमेदवार उभे केल्यामुळे चुरस निर्माण झाली होती. पण, पडद्यामागे राजकीय घडामोडींना वेग आला होता. अखेर, काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळत माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेनेनं नरमाईची भूमिका घेतली होती. शिवसेनेनं उमेदवार देऊन ऐनवेळी माघार घेतली होती. सेनेनं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीकडे स्थायी समितीचे अध्यक्षपद गेले होते. आता मुंबई पालिकेतही काँग्रेसने माघार घेऊन सेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेत दोन महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून काँग्रेस आपले अर्ज मागे घेणार आहे. आज शिक्षण आणि स्थायी समितीच्या अध्यक्षापदासाठी निवडणूक होणार आहे. महापालिकेतील विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने या दोन्ही पदासाठी अर्ज भरले होते. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.

पण आता राज्यातील आघाडी धर्म टिकवण्यासाठी काँग्रेस माघार घेत असल्याची माहिती मिळत आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करून राज्यातील आघाडीत बिघाडी आणण्याचा भाजपचा डाव त्यामुळे फसला आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी यशवंत जाधव यांना तिसऱ्यांदा शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. महापालिका मुख्यालयात यशवंत जाधव यांनी स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी संध्या दोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

 

Read Also :