ब्राझिलिया : जगभरात अनेक कोरोना प्रतिंबधक लसींवर काम सुरू आहे. काही देशांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात सर्वात प्रमुख लसींपैकी एक असलेली फायझर-बायोएनटेकची लस आहे. जगभरातील तज्ञ या लसीवर विश्वास दाखवत असताना, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनी या लसीवर अविश्वास व्यक्त केला आहे. लसीच्या दुष्परिणामांमुळे स्त्रियांना दाढी येऊ शकते किंवा तुम्ही मगरही होऊ शकता, असा विचित्र दावा त्यांनी केला आहे.
‘तुम्ही जर कोरोनाची लस घेतली, तर त्यानंतर होणाऱ्या परिणामांसाठी ब्राझील सरकार जबाबदार राहणार नाही. जर ही लस घेतल्यानंतर तुम्ही मगर झालात किंवा लस घेणाऱ्या महिलांना दाढी आली, तर ती सर्वस्वी त्यांची जबाबदारी असेल’, असे वक्तव्य बोल्सोनारो यांनी केले आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर आता सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.
मला स्वत:ला कोरोना झाला आहे. पण मी कोरोनाची लस टोचून घेणार नाही. कारण कोरोनाशी लढा देण्यासाठी माझ्या शरीरात अँटिबॉडीज आहेत. मग कशासाठी मी कोरोनाची लस टोचून घेऊ?, असे वक्तव्य देखील त्यांनी केले आहे.
दरम्यान, ब्रिटन, अमेरिकेसह काही देशांनी फायझरच्या लसीला मान्यता देऊन लसीकरणास सुरुवात केली आहे.