भारतासाठी मोस्ट वाँन्टेड असणारा अतिरेकी दाऊद इब्राहिम पाकिस्तान मध्येच असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानने स्वत: याबाबत खुलासा केला असून दाऊद पाकिस्तानात असल्याची कबूली पाकने दिली आहे. पाकिस्तानच्या या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानमध्येच लपून बसला असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानने प्रथमच दिली आहे. दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी देखरेख ठेवून असणाऱ्या एफएटीएफ या संस्थेच्या कारवाईची टांगती तलवार पाकिस्तावर आहे. त्यामुळे या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्तानने ८८ दहशतवादी संघटना आणि हाफिझ सईद, मसूद अझहर आमि दाऊद इब्राहिमसह अन्य काही बड्या दहशतवाद्यांवर कारवाईचा बडगा उगारत कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत.
या आधी भारताने अनेकदा पुरावे देऊन दाऊद हा पाकिस्तानमध्ये राहत असल्याचं सांगितलं होतं. मात्र पाकिस्तानने त्याचा कायम इन्कार केला आहे. आता पाक सरकारने घोषीत केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीतच दाऊदचं नाव असल्याने भारताच्या दाव्याला बळ मिळालं आहे.