नागपूरमध्ये काही दिवसांपुर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये महापौर संदीप जोशी आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा दावा करण्यात आला होता. या ऑडिओ क्लिपवरून आता चांगलेच राजकारण तापले आहे. याविषयी आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी असे म्हटले आहे.
नागपुरातील एका ऑडिओ क्लिपची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीला राजकीय वळण देण्याचा होत असलेला दुर्दैवी प्रयत्न,त्यामुळे आता कारवाईच्या निष्पक्षतेबाबत उभे राहत असलेले प्रश्नचिन्ह.
गंभीर आरोप असल्याने कठोर कारवाई करण्याबाबत गृहमंत्री श्री अनिल देशमुखजी यांना पुन्हा पत्र.. pic.twitter.com/gZdBzkMxee— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 18, 2020
फडणवीसांना गृहमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, या प्रकरणात राजकारण होत आहे, हे योग्य नाही. अशीच परिस्थिती राहिली तर मी स्वत: मुख्य न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांच्याकडे ऑडिओ क्लिप सादर करून चौकशीची मागणी करेल.
या क्लिपमुळे चर्चेत आलेल्या साहील सय्यद याच्यावरून सध्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. साहिलचे विविध पक्षातील नेत्यांसोबतचे फोटोही व्हायरल केले जात आहे.
फडणवीस यांनी पत्रात म्हटले की ‘साहील सय्यद याचे प्रदेश भाजपचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी आमदार सुधाकर देशमुख इत्यादी नेत्यांसोबत फोटो असल्याने तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. सदर आरोपीचे शरद पवारजी, अजित पवार, नितीन राऊत व स्वतः आपल्यासोबतचे काही फोटो व्हायरल होत आहेत. सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या व्यक्तीचे कुणा व्यक्तीसोबत फोटो आहे, याचा अर्थ त्या दोघांमध्ये संबंध आहेत असा होत नाही. आरोपीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबतही फोटो आहेत. संबंधित क्लिपमध्ये न्यायव्यवस्थेवरच टिप्पणी केली आहे. हा गंभीर विषय आहे. परंतु आता राजकारण होत आहे.