सांगली : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर आता राज्यातील राजकारण तापले आहे. याआधी महाविकास आघाडीतील प्रताप सरनाईक आणि एकनाथ खडसे या नेत्यांना देखील ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर आता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
चांगले काम केले तर कुणाला नोटीस मिळत नाही, त्यामुळे जर चांगले काम केले असेल आणि कुठलीही चूक नसेल तर कुणी घाबरण्याचे कारण नाही, असा टोला फडणवीसांनी संजय राऊतांना लगावला आहे.
मागील काही दिवसात अनेक नेत्यांना ईडीची नोटीस मिळाली आहे. याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, आता मिळाली कुणाला, कुणाली नाही मिळाली, हे मला माहिती नाही. कारण मी त्यांचा प्रवक्ता नाही.
दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या अकाउंटमधून काही व्यवहार वर्षा राऊत यांच्या अकाउंटमध्ये झाल्याचे सांगितले जात असून, याच व्यवहाराशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहेत. 29 डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.