बुलडाणा : राज्यातल्या करोना परिस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यातच शनिवारी दमण इथल्या ब्रूक्स फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा जाब विचारण्यासाठी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि काही नेते, हे विलेपार्लेच्या बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात गेले होते.
यावरून सध्या राज्यात जोरदार राजकारण सुरु आहे. या घटनेनंतर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना, ‘मला करोनाचे जंतू सापडले, तर मी ते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते’, अशी टीका केली होती.
त्यांच्या या टीकेला फडणवीसांनी उत्तर देत, कदाचित रात्रीची उतरली नसेल आणि त्यातच आमदार संजय गायकवाड यांनी ती पत्रकार परिषद घेतली असेल. मला त्यांना एकच विनंती करायची आहे; की त्यांनी अशाप्रकारे करोनाचे विषाणू माझ्या घशात घालण्याआधी हँड ग्लोव्हज घालावेत आणि नीट मास्क लावावं, असा टोला लगावला होता. यात त्यांनी गायकवाड यांचा ‘तळीराम’ असा उल्लेख केला होता.
आता या टीकेला संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनाच तळीराम पाळायची सवय असून लेडीज बारमध्ये त्यांच्या जवळचे मंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जातात’, असे जोरादर प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी फडणवीसांना दिले आहे. तसेच फडणवीसांनी मला सल्ला द्यायची गरज नाही, त्यांनी केंद्राला सल्ला द्यावा, असा टोला देखील संजय गायकवाड यांनी लगावला आहे.