अकरावी बारावीमध्ये प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे कोरोनाच्या काळात नुकसान होऊ नये या उद्देशाने बीड जिल्हा परिषद व अभिनव आयटी सोल्युशन्स पुणे यांनी संयुक्तरित्या तयार केलेले इझिटेस्ट हे ई – लर्निंग अँप आज राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत खुले करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते एक वेबिनार द्वारे या अँपचे उदघाटन करण्यात आले.
या अँपला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेत आता हे अँप राज्यातील अकरावी बारावी मध्ये प्रवेश घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत खुले करण्यात आले आहे. शिक्षकांनी नवनवीन संकल्पना राबवून या अँप मध्ये अकरावी बारावीचा अभ्यासक्रम सुकर करावा तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून या अँपचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी केले आहे.
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अकरावी – बारावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळून त्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळावेत यासाठी ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पुढाकार घेत बीड जिल्हा परिषद व पुणे येथील अभिनव आयटी सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे अँप जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिले होते. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी या अँपद्वारे मोफत ऑनलाईन धडे घेतले.