पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. महापालिकेतील स्थायी समितीच्या सभेत सभापतींच्या मनमानी कारभारावर आक्षेप नोंदवून भाजपच्याच नगरसेवकांनी आज भरसभेत राडा घातला. यावेळी मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली असून चार नगरसेवकांनी ही तोडफोड केली आहे. याचबरोबर अधिकाऱ्यांना देखील यावेळी धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर स्थायी समितीची पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये स्थायी समिती सभापतिपदी आमदार लांडगे समर्थक असल्याने जगताप समर्थक नगरसेवक आणि लांडगे समर्थक नगरसेवकांमध्ये कायम धुसपूस सुरु असते. परंतु आज सभेवेळी मोठ्या प्रमाणात राडा घालून तोडफोड करण्यात आली. सभेवेळी चार नगरसेवकांना सुरक्षा रक्षकांनी आत जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर सभेमध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बोगस एफडीआरप्रकरणी खुलासा करण्याची मागणी केली.परंतु याचा खुलासा न केल्याने चिडलेल्या या भाऊ समर्थक नगरसेवकांनी सभागृहात राडा घातला.
दरम्यान, या सभेत मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली असून, टेबलवरील माईकची तोडफोड केली असून ग्लास फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्या आदेशावरून आपल्याला सभागृहात येण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप देखील यावेळी या चार नगरसेवकांनी केला.