जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या गाडीला काल भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. महाजन यांनी अपघातग्रस्त जखमीला तात्काळ स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केले. पाचोरा तालुक्यातील लोहारा-वरखेडे रस्त्यावर हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे आमदार गिरीश महाजन हे मुंबई येथील कामकाज आटोपून जामनेर येथे आपल्या घराकडे येत होते. पाचोरा तालुक्यातील लोहारा–वरखेडे रस्त्यावर अचानक त्यांच्या वाहनाला मागून एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी जखमीला मदत करण्यात कोणी पुढे येत नव्हतं. गिरीश महाजन यांनी स्वत: जखमी तरुणाला मदत केली. महाजन यांनी जखमी तरुणाला आपल्या गाडीत बसवून तात्काळ पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले.
हा जखमी तरुण आरोग्य विभागातील कर्मचारी असून वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कामाला आहे. त्याचे नाव बी. सी पवार असे आहे. रस्त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्याला वाहन चालवण्यात अडथळे आल्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.