मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून नोटीस मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र खडसेंकडून अद्याप आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले आहे.
पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले असल्याचे म्हटले जात आहे.
याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना खडसे म्हणाले की, मला ईडीची नोटीस मिळाली नसून, नोटीस मिळाल्यानंतर मी स्वत:ची भूमिका स्पष्ट करेन.
ख्रिसमसची सुट्टी असल्याने कदाचित नोटीस अद्यापपर्यंत पोहोचलेली नाही. कोणत्याही तपास यंत्रणेने नोटीस पाठवली तरी मी चौकशीला सामोरं जाण्यास पूर्णपणे तयार आहे. मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याचं कारणच नाही, असेही खडसे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपला रामराम करुन ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा दिला होता.