मुंबई : विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून याबद्दल कोणताही निर्णय झाला नाही. लवकरच या 12 जागांसाठी निवड होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना विधानपरिषदेवर पाठवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत टीव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांकडे एकनाथ खडसे यांच्या विधानपरिषदेतील नियुक्तीसाठी शिफारस जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय काँग्रेसकडून सत्यजित तांबे आणि राष्ट्रवादीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.