मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे मागील अनेक दिवसांपासून पक्षातील नेत्यांमुळे नाराज आहेत. एकनाथ खडसे सातत्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहे, याशिवाय ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील जोरात सुरू आहे. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे पक्षाचे नुकसान होईल असे काहीही करणार नाही, असे म्हटले आहे.
खडसे समजूतदार नेते आहेत. ते आमचे पालक आहेत. बंद खोलीत त्यांनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही. त्यांनी प्रत्येकवेळी बोलण्यासाठी दांडे (चॅनेल) वापरू नयेत, अशी भावनिक साद चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना घातली आहे.
पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, खडसे राष्ट्रवादीत जाणार आहेत अशा चर्चा माध्यामांकडून होत आहेत. पण ते पक्षाचे नुकसान होईल असं काहीही करणार नाहीत. आजच्या बैठकीला ते पूर्णवेळ उपस्थित होते. ते पाय रोवून खंबीरपणे भाजपमध्येच आहेत.