नवी दिल्ली : गेल्या १९ एप्रिलला देशाचे दोन वेळा पंतप्रधानपद भूषविलेले मनमोहन सिंग यांची करोना चाचणी सकारात्मक आली होती. यानंतर त्यांना एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर योग्य ते उपचार डॉक्टरांकडून केले जात होते. डॉक्टरांच्या या प्रयत्नांना यश आले असून, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी करोनावर मात केली आहे. त्यांना गुरुवारी एम्समधून घरी पाठवण्यात आले.
तसेच, ८८ वर्षीय मनमोहन सिंग यांनी करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्हीही डोस घेतले आहेत. दरम्यान, करोनाची लागण होण्यापूर्वी त्यांनी देशाचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. देशातल्या सद्य परिस्थितीवरुन पत्र लिहून, काही उपयुक्त अशा सूचना केल्या होत्या.
या पत्रात त्यांनी, देशातील करोनाविरोधातील लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला दिला होता. तसेच, आतापर्यंत किती लोकांचे लसीकरण झाले आहे, याकडे लक्ष न देता एकूण लोकसंख्येपैकी कीती लोकांचे लसीकरण झाले आहे. यावर लक्ष केंद्रित करण्यात यावे, असे सिंग म्हटले होते. याचबरोबर, डॉ. मनमोहन सिंग यांनी ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही लसीकरणामध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत ३,७९,२५७ नवे करोना बाधित रुग्ण सापडले असून, २,६९,५०७ रुग्ण बरे झाले आहेत, तर करोनाने ३६४५ रुग्णांचा गेल्या २४ तासात बळी घेतला आहे. त्यामुळे देशात एकूण मृतांचा आकडा २,०४,८३२ झाला असून, सध्या ३०,८४,८१४ रुग्ण उपचार घेत आहेत. आजवर देशात एकूण १,८३,७६,५२४ रुग्ण सापडले असून, यापैकी १,५०,८६,८७८ बाधित रुग्ण बरे झाले आहेत.