पुणे : महाराष्ट्रातील करोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात करोना प्रतिबंधक नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या गेल्या आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला लॉकडाऊन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे देखील आदेश दिले आहेत. तसचं शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देत, येत्या दोन दिवसांत राज्यात आणखीन कडक निर्बंध लावणार असल्याची पुष्टी दिली.
दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील करोना बाधितांचा सततचा वाढता आकडा लक्षात घेऊन, पुण्यातही शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना आढावा बैठकी पार पडली. यानंतर पुण्यात देखील नव्याने काही बंधने जाहीर करून, शनिवारपासून पुढील सात दिवस मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी भाजपच्या नेत्यांकडून पुण्यात संचारबंदी व पीएमपीएमएल सेवा बंद करण्याच्या निर्णयाला तोंडी विरोध दर्शवला होता.
मात्र आज, नवीन नियमावलीतील काही नियमांना भाजपच्या नेत्यांनी विरोध दर्शवत, जमावबंदीच्या पहिल्याच दिवशी, थेट रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. हा विरोध दर्शविण्यासाठी खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वारगेट येथील पीएमपीएलच्या ॲाफिस बाहेर आंदोलन करत प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच संचारबंदीचा आदेश आपण पाळणार नसल्याचे मुळीक यांनी यावेळी जाहीर केले आहे.
यावेळी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी बापट आणि मुळीक यांची भेट घेत, त्यांना जमावबंदीमुळे आंदोलन बंद करण्याची विनंती केली. मात्र भाजप नेत्यांनी त्यांची विनंती धुडकावून लावत आंदोलन सुरु ठेवल्याने, पोलिसांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, यावेळी बापट म्हणाले, याचे थेट परिणाम आर्थिक घडी विस्कटण्यावर होणार आहेत. जमावबंदी आम्हांला मान्य. पण संचारबंदी नाही. टेस्टींग वाढवा, जमाव करणाऱ्यांना दंड करा. पण फक्त सत्ता आहे म्हणून दहशत दाखवणे योग्य नाही. सरकार जे करेल त्याला आम्ही मदत करु. करोना फक्त सरकारची जबाबदारी नाहीत. पण संचारबंदी आणि पीएमपीएमएल बंद करण्याच्या निर्णयाला आमचा विरोध आहे. तसेच निर्णयाचा फेरविचार केला नाही तर भाजप कार्यकर्ते पीएमपीएलच्या प्रत्येक स्टॉपवर आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.