अहमदनगर : नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशात कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यासाठी सरकारकडून लसीकरणासाठी नियोजन केले जात आहे. मध्यप्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यातील नागरिकांना मोफत कोरोना लस उपलब्ध केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून देखील महाराष्ट्रात कोरोना लस मोफत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील जनतेला देखील कोरोना लस मोफत मिळावी, अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसा निर्णय जाहीर करावा,’ अशी मागणी माजी मंत्री राम शिंदे यांनी केली आहे.
नगर जिल्हा भाजपच्यावतीने आज आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत असताना, त्यांनी राज्यातील नागरिकांना मोफत लस देण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर देखील निशाणा साधला. हसन मुश्रीफ यांनी हत्ती पकडण्याचे, हत्ती पळवून लावण्याचे त्यांचे कौशल्य बिबट्याच्या संदर्भात जिल्ह्यात लावावे, असा टोला शिंदे यांनी लगावला.