कोल्हापूर: महाराष्ट्र राज्यात जागतिक महामारीची साथ मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. जागतिक महामारीची साथ मोठ्या प्रमाणावर वाढत असताना पण कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध निवडणुकीला रंगत आली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसून येत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी महादेवराव महाडिक यांच्यावर टीका केली आहे.
खासदार मंडलिक यांनी म्हटले आहे की,”जिल्ह्याचा बाप ते स्वतःला समजतात.ते बाप नाहीत तर अखंड जिल्ह्याचा ताप आहेत. हा ताप राधानगरीकर उतारवल्याशिवाय राहणार नाहीत. गोकुळ लुटण्याचे काम ते करत आहेत, त्यांची टँकरगिरी थांबवा” असा इशाराच खासदार संजय मंडलिक यांनी दिला आहे. ते अर्जुनवाडा तालुका राधानगरी येथे विरोधी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या ठराव धारकाच्या सभेत ते बोलत होते.
या सभेत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले की,” माजी खासदार धनंजय महाडिक म्हणतात. आमचे गोकुळमध्ये एक पण टँकर नाही.तर महादेवराव महाडिक म्हणतात आमचे ४० टँकर आहेत. यांच्यातच ताळमेळ नाही. त्यांना टँकरचे दर महिन्याला ४० लाख मिळतात. त्यामुळे तारखेकडे त्यांचे लक्ष असते.”
काय म्हणाले होते महादेवराव महाडीक
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या – गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने माझ्यावर बरीच टीका – टिपणी सुरू आहे . त्याचे उत्तर आज देण्याची मला गरज वाटत नाही . योग्य वेळी समक्ष चौकात उत्तर देईन . मी सर्वांचा बाप आहे , पुरुन उरणार , अशा शब्दांत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विरोधकांचा समाचार घेतला .कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या – गोकुळ निवडणुकीतील सत्ताधारी राजर्षि शाहू आघाडीचा मेळावा झाला . या प्रसंगी महाडिक बोलत होते. महाडिक म्हणाले , लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. पण, गोकुळ गोरगरिबांचा आहे. तो दूध उत्पादक – कर्मचाऱ्यांच्या ताब्यात राहिला पाहिजे . त्याला धक्का लागता कामा नये. आरोप करणे विरोधकांचे कामच आहे. पण, तुमच्या कृपेने विजय आमचाच आहे. संघ योग्य हातात राहण्यासाठी एकही मत इकडे – तिकडे होता कामा नये.