कोल्हापूर: महाराष्ट्रात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीनंतर आता कोल्हापूर मधील जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. कोल्हापूर जिल्हातील पारंपरिक वैरी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक हे एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. गोकुळच्या मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. बंटी पाटील – मुश्रीफ गटाने चार जागांवर विजय मिळवला आहे तर महाडिक गटाने १ जागेवर विजय मिळवत खाते उघडले आहे.
विरोधी गटातून अमरसिंह पाटील, सूचित मिणचेकर, अंजना रेडेकर, बायजी शेळके यांनी विजय मिळवला आहे तर सत्ताधारी गटातून शौमिका महाडिक या विजयी झालेल्या आहेत. सर्वसाधारण गटातील १६ जागांच्या मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. बंटी पाटील-मुश्रीफ गटाने सर्वसाधारण गटात देखील आघाडी घेतली आहे. सत्ताधारी गटाच्या ७ तर विरोधी आघाडीच्या ९ जागा आघाडीवर आहेत. मतमोजणी जसजशी पुढे सरकेल तशी क्रॉस व्होटिंगमुळे दोन्ही गटांची धाकधूक वाढली आहे. पालकमंत्री सतेज पाटील , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधी आघाडीने सत्ताधारी गटाची काळजी वाढविली आहे. राखीव गटात सर्वच जागांवर निर्णायक मते घेऊन विजय मिळविल्यानंतर सर्वसाधारण गटात काय होणार याची धाकधूक लागली आहे.
गोकुळच्या राखीव गटात सतेज पाटील गटाने बाजी मारल्यानंतर आता सर्वसाधारण गटाची मतमोजणी सुरू झाली आहे. १६ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात असून पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. क्रॉस व्होटिंग होत असल्याचे दिसून येत आहे . ५० मतपत्रिकांमागे २५ मते ही क्रॉस व्होटिंगची तर २५ मते पॅनेल टू पॅनेल असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जयपराजयाचे पारडे दोलायमान होण्याची शक्यता आहे. परिणामी निकालालाही अपेक्षेपेक्षा दोन तास उशिर लागण्याची चिन्हे आहेत.